एका निरपराध मुलीला कागदोपत्री मृत घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार

बीड, २३ जानेवारी २०२५:

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एका जिवंत मुलीला कागदोपत्री मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे उघडकीस आला आहे. ग्रामसेवक महेश वाकळे यांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्रावर अधिकृत स्वाक्षरी केल्याचा गंभीर आरोप आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख अक्षय गोटेगावकर यांनी या प्रकरणाची तक्रार बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल केली आहे.

नेमका प्रकार काय?

एका महिलेने सरकारी कंत्राटी नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त दोन अपत्ये असण्याची अट होती. संबंधित महिलेला तीन अपत्ये असल्याने तिने नियमांचे पालन करण्यासाठी आपल्या जिवंत मुलीला कागदोपत्री मृत घोषित केले. विशेष म्हणजे, या बनावट मृत्यू प्रमाणपत्रावर ग्रामसेवक महेश वाकळे यांची अधिकृत स्वाक्षरी होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सरकारी नियमांची पायमल्ली झाली आहे. अक्षय गोटेगावकर यांनी या गैरप्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बनावट मृत्यू प्रमाणपत्रावर अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्या ग्रामसेवकासह सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, आम्ही शांत बसणार नाही. जर दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.

– अक्षय गोटेगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *