पुणे, ३ जानेवारी २०२५:
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात लहानगी आराध्या देवकुळे हिने सादर केलेल्या “आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले” या गीताने झाली. यानंतर अध्यक्ष वसंततात्या साळवे यांनी आपल्या भाषणात “सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष प्रत्येक वंचित घटकासाठी प्रेरणादायी आहे.” असे सांगितले.
महिला आघाडीच्या अनिताताई चव्हाण म्हणाल्या, “आजच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याची गरज आहे.”

महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका रासकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या,
स्पायडरमॅन आणि सुपरमॅनपेक्षा आपल्या थोर नेत्यांचे संस्कार मुलांवर होणे अधिक महत्त्वाचे आहे.
सागर सितानामदेव आल्हाट आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करत, समाजसुधारणेचा प्रकाश आजही तितक्याच तेजाने झळकत असल्याचा संदेश देण्यात आला.