कर्नाटक, १ जानेवारी २०२५:
कर्नाटकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर प्रयत्न दिसला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, संपूर्ण सजावट ही टाकाऊ साहित्यातून साकारली गेली होती. आयोजक देवदत्त नाईक यांच्या म्हणण्यानुसार,
नवीन वर्षात पर्यावरण जतनावर भर देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यासोबतच टाकाऊ साहित्य वापरल्याने वायफळ खर्च देखील वाचला आणि जुन्याच गोष्टींना नवं रूप मिळालं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यक्षगानासारख्या स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे हादेखील एक हेतू होताच.
कार्यक्रमाच्या सजावटीसाठी प्लास्टिकच्या बाटल्या, पुठ्ठे, जुने फलक, नैसर्गिक रंग आणि रद्दीतील कागद वापरण्यात आले होते. पर्यावरणपूरकतेचा संदेश देत, या कार्यक्रमाने स्थानिक संस्कृतीला एक नवा आकार दिला. प्रेक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे आपल्या संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख मिळेल आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल समाजाला नवा विचार मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.



स्थानिक कलेच्या सादरीकरणासंबंधी आयोजक देवदत्त नाईक सांगतात, “यक्षगान हे कर्नाटकमधील पारंपरिक लोकनृत्य-नाटक आहे, जे नृत्य, संगीत आणि नाट्यकथनाचा अनोखा संगम आहे. रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांवर आधारित या नाटकांमध्ये कलाकार मोठे मुकुट घालतात आणि रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करतात. यक्षगानाच्या दोन प्रमुख शैली आहेत—बडगुटिट्टू आणि तेनकुटिट्टू—ज्या त्यांच्या संगीत आणि सादरीकरणाच्या पद्धतींमध्ये वेगळ्या आहेत. या नाट्यकलेत संवाद पूर्वनियोजित नसतात, त्यामुळे कलाकारांना प्रसंगानुरूप त्वरित सादरीकरण करावे लागते. आजही कर्नाटकमध्ये यक्षगान मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तो जगभर लोकप्रिय होत आहे.”
या कार्यक्रमाने पारंपरिक कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, पर्यावरणपूरक समारंभ साजरा करण्याची नवी संकल्पना मांडली. प्रेक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Instagram पेजवर भेट द्या: वार्ताहर Instagram Reel