शाई
पूर्ण, अपूर्ण, आवडत्या, नावडत्या स्वप्नांची रात्र आहे,
उद्याचा सूर्योदय माझ्यासाठी आहे, ह्याची खात्री आहे.
वर्तमानात जगते आहे, असे जरी माझे म्हणणे आहे,
तरी भूत आणि भविष्यकाळाशी लढाई रंगली आहे.
कळतंय मला, होय, मला सगळ्याची जाणीव आहे,
म्हणता म्हणता आयुष्याची संध्याकाळ उगवली आहे.
जगलेल्या क्षणांना भूतकाळाची झालर लपेटली आहे,
विस्मृतीत गेलेल्या घटनांची यादी आजही ताजी आहे.
सहजी माघार मला घ्यायची नाही, खूणगाठ बांधली आहे,
हे आयुष्या, तुझ्या तालावर जगण्याची सवय मुरली आहे.
आठवणींच्या तळाशी, सुख दुःखाची सावली थांबली आहे.
कागद कोराच राहिला आहे, पण शाई अजून उरली आहे.