मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘मूइस ऑफ रफी’ गीत संमेलनाचे आयोजन (छायाचित्र : Open magzine)

पुणे, ५ जानेवारी २०२५:

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘मूइस ऑफ रफी’ या भव्य संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. रफी यांच्या अमर गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले आणि श्रोत्यांना त्या सुवर्णयुगाची आठवण ताजी झाली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक गफार मोमीन होते. त्यांनी मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना आपल्या आवाजातून नवीन रंग भरले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. श्रोत्यांना क्षणभर रफी युगात गेल्यासारखे वाटले.

या संमेलनात विविध प्रसिद्ध गायक-गायिकांनी मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना सुरेल अभिवादन केले. यामध्ये साधना शर्मा, अश्विनी बिरारी, स्वाती पटवर्धन, केतकी जाधव, प्राची दातार, शारदा मिश्रा, सुनीता कुलकर्णी, स्मिता गिरमे, मीनाक्षी जोशी, अनघा चिंचवडकर, संगीता खरवडे, साधना कुर्लेकर आणि बालगायक अयुधा बिरारी यांनी सहभाग घेतला. त्यांच्या सादरीकरणाने या मैफिलीला अजूनच रंगत आणली.

कार्यक्रमाचे आयोजन झळकी नागण्णा यांनी केले. या संगीत संमेलनाद्वारे मोहम्मद रफी यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. आजही श्रोतावर्ग रफी यांच्यावर तितकेच प्रेम करतो, हे कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती सांगत होती. रफी यांचे संगीत रसिकांच्या मनात कायमचे राहील.

अशा कार्यक्रमांमुळे रफींच्या गाण्यांची आठवण पुन्हा एकदा रुजली आणि संगीत प्रेमींना एक सुंदर अनुभव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *