पुणे, ८ मार्च २०२५
जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता आणि देखभाल करणाऱ्या महिलांना गुलाब फुल देऊन गौरवण्यात आले. महिलांच्या कष्टाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांचा गौरव करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आणि नवश्या मारुती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विपुल सोनवणे म्हणाले,
“महिला दिवस हा केवळ औपचारिकतेपुरता न राहता, प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. समाजात महिलांना योग्य मान-सन्मान मिळावा यासाठी आम्ही पुढेही असे उपक्रम राबवू.”
या उपक्रमात सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“अशा उपक्रमांमुळे आमच्या मेहनतीची दखल घेत असल्याचे समाधान मिळते. हा छोटासा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायक आहे.”
महिला दिनानिमित्त महिलांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. भविष्यातही महिलांच्या सन्मानासाठी असे उपक्रम राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.