माझा प्रवास एका शिक्षक घराण्यात जन्मलेल्या, शिकण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलीचा आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या. एक स्मॉल टाउन ब्रीड असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा मला मिळाला. कुटुंबातील प्रेम आणि सहवासातून मला एकी आणि त्याचं महत्त्व समजलं.
जशी मोठी होत गेले, तसं लक्षात आलं की स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्यात वेगवेगळे अनुभव आले, अनेक राज्यांमध्ये नोकरीनिमित्त फिरण्याची संधी मिळाली, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आले. त्यांच्याकडून शिकत, नवीन दृष्टीकोन आत्मसात करत मी आज या टप्प्यावर पोहोचले आहे.
फिटनेसचा प्रवास
वयाच्या २४व्या वर्षी मला फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी सतत डॉक्टरांकडे जावं लागलं. वेगवेगळी औषधं, इंजेक्शन्स यामुळे वजन झपाट्यानं वाढलं आणि आत्मविश्वास कमी होत गेला. त्या काळात मुलीकडे लक्ष देणं महत्त्वाचं होतं, पण जसजशी ती मोठी झाली, तसं लक्षात आलं की स्वतःकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.
२०१८ मध्ये फिटनेसकडे गांभीर्यानं पाहायचं ठरवलं. शाळेत मी कधी अॅथलीट नव्हते, त्यामुळे शरीर लवचिक नव्हतं. पण ध्येय स्पष्ट होतं—फिटनेस मिळवायचा! मात्र, कसं सुरुवात करावी, हे कोडंच होतं. याच वेळी माझा बावधन ब्रिगेड रनिंग ग्रुपशी संपर्क आला.
मी पोल टू पोल रनिंग म्हणजे १०० मीटर पळणं आणि १०० मीटर चालणं असं हळूहळू सुरू केलं. त्याचसोबत डायट काऊन्सिलिंग घेतलं, प्रोटीनचा योग्य प्रमाणात समावेश केला, घरचं पौष्टिक आहारावर भर दिला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मी १५ किलो वजन कमी केलं!
सातत्य हाच यशाचा मंत्र
फक्त धावणं नव्हे, तर फिटनेसचा प्रवास पुढे सुरूच ठेवला. पाच किलोमीटरपर्यंत रनिंग, जिम ट्रेनिंग, सूर्यनमस्कार यामुळे फिटनेस आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. आता परिस्थिती अशी आहे की, मी जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी रोजच्या दिनक्रमात व्यायाम असतोच.
युरोप टूर असो वा कामाच्या व्यस्तता, माझं शरीर ही माझी खरी ओळख आहे, आणि त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.
महिलांसाठी फिटनेस का महत्त्वाचा?
वय वाढत असताना महिलांमध्ये ऑस्टिओपोरॉसिस (हाडं ठिसूळ होण्याचा आजार) होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि सातत्य ठेवल्यास शरीर निरोगी राहू शकतं. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी सहज लोकल प्रवास करणं असो किंवा १८० ते २०० सूर्यनमस्कार न थकता घालणं असो—हे सर्व शक्य झालं, ते फिटनेसच्या शिस्तीमुळे!
फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करणे नव्हे!
लोक म्हणतात, “एक दिवस खाल्लं तर काय फरक पडतो?” पण मी ठरवलं होतं की कोणतंही प्रलोभन माझ्या फिटनेसला आडवं येऊ द्यायचं नाही.
बऱ्याच वेळा मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर भेटणं, समारंभांना जाणं हे आलंच. पूर्वी मला असं वाटायचं की सोशलायझिंग म्हणजे चांगलं खाणं-पिणं, गप्पा मारणं. पण नंतर लक्षात आलं की मुलाखती, वाचन, नवे विषय समजून घेणं, एकमेकांच्या अनुभवांमधून शिकणं—हीदेखील सोशलायझिंगचीच एक बाजू आहे.
तरुण पिढीसाठी एक संदेश
आजच्या तरुण पिढीत ओबेसिटी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी लाइफस्टाइल आणि फास्ट फूड. पण यावर उपाय आहे—योग्य निर्णय घेणं!
मोबाइलवर एका बटणावर जेवण मागवणं सोप्पं आहे, पण तिथेच हेल्दी पर्याय निवडला, तर ही सोयही तुमच्या फायद्याची ठरू शकते. स्मार्ट निर्णय, हेल्दी निवड आणि सातत्यपूर्ण फिटनेसचा सराव हेच तुमच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचं आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा!
लोक कधी कधी म्हणतात, “एक दिवस खाल्लं तर काही बिघडत नाही!” पण ध्येय स्पष्ट असेल, तर कोणतीही प्रलोभनं तुम्हाला मार्गावरून हटवू शकत नाहीत. मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याच जोरावर आजही फिटनेसच्या प्रवासावर अविरत चालत आहे.
माझ्या सारखी सामान्य स्त्री हे करू शकते, तर तुम्हीही हे करू शकता!
फक्त स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि “चलते रहो, चलते रहो!”
Manjiri, I have seen your journey and am proud of you! You are an inspiration to all! Wishing you good health & happiness always!