पुणे, ३ जानेवारी २०२५:
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हेअरकट, दाढी, थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि फेशिअल यांसारख्या सेवांसाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हेअरकटसाठी ५० ते १०० रुपये अधिक मोजावे लागत असून, फेशिअलच्या किमती २०० ते ५०० रुपयांनी वाढल्या आहेत.
व्यावसायिक स्वरा जकाते म्हणतात की,
वस्तू आणि सेवा कर (GST) वाढल्यामुळे प्रसाधनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच, दुकानांचे भाडे आणि इतर खर्च वाढल्याने दरवाढ अपरिहार्य होती. मात्र, आम्ही ती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ग्राहकांवर मोठा आर्थिक ताण पडू नये.
ग्राहकांमध्ये या दरवाढीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले रोहन पाटील म्हणतात, “महागाईमुळे दरवाढ अपेक्षित होती, पण सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात इतकी वाढ होईल, असे वाटले नव्हते. माझा महिन्याचा सलून खर्च ५०० रुपयांवरून ७५० रुपयांपर्यंत गेला आहे.”
गृहिणी स्मिता गवळी यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, “थ्रेडिंग आणि वॅक्सिंगच्या दरात वाढ झाली असली, तरी स्वच्छता आणि दर्जेदार सेवा मिळत असल्याने ती समजून घेता येईल. हल्ली सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत, त्यामुळे ही दरवाढही समजून घ्यावी लागेल.”
सलून व्यावसायिक प्रिया चंदनशिवे यावर म्हणतात, “महागाईमुळे दरवाढ टाळता येणे कठीण होते. मात्र, ग्राहकांचा विश्वास टिकवणे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे, त्यामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम करण्यावर भर देत आहोत.”
एकूणच, महागाईमुळे सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात वाढ झाली असली, तरी ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत असेल, तर वाढलेला खर्च स्वीकारण्यास हरकत नाही.