या पॉडकास्ट मधील सगळी पात्रं काल्पनिक आहेत आणि ही अशी पात्रं तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात नक्कीच भेटली असतील.

या पॉडकास्ट मधली आदर्श को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी म्हणजे विविध स्वभावाची माणसं, त्यांच्या सवयी, प्रसंगानुसार होणाऱ्या चर्चा, वादविवाद आणि त्यातून घडणाऱ्या मजेशीर गोष्टींचं जणू केंद्रच! येथे घडणाऱ्या वार्षिक सभेपासून हुरडा पार्टीपर्यंतच्या सर्व प्रसंगांनी तुमचं मनोरंजन नक्कीच होईल. आता mostly Mr. India असलेले देशमुख काका असो किंवा स्वतःच्या जगात गुंग असलेली बबडी, सोसायटीतील महिला मंडळाचं गॉसिप असो किंवा पुरुषांची रद्द झालेली ट्रिप इथे प्रत्येक पात्र जणू एक नगच आहे आणि असे नग एकत्र आल्यावर गोंधळ तर होणारच. गप्पा गोष्टी, भांडणं, थोडा रुसवा फुगवा आणि थोडा देखावा अशा विविध प्रसंगांनी शिवलेली ही रक्तापलिकडच्या नात्याची रजई आणि याच रजईची ऊब हा पॉडकास्ट ऐकून तुम्हालासुद्ध अनुभवता येईल!!

Episode 1: ॲन्युअल सोसायटी मीटिंग

हा पॉडकास्ट मला खूप रिअलिस्टिक वाटला.

ॲन्युअल सोसायटी मीटिंगच्या आधी  मि. देशमुख यांच्या घरात जसा संवाद होतो तसेच संवाद आपल्या घरातून सुद्धा ऐकायला मिळतात. सोसायटी मीटिंगमध्ये सुद्धा ज्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते जसे की या पॉडकास्ट मध्ये कल्चरल प्रोग्रामसाठी असलेल्या रकमेतील वाढ करण्यावरून झालेली चर्चा. त्याचं अतिशय सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. वॉचमनचं काम,लेलेंचं मराठी+ हिंदीतून त्याला काम सांगणं, सातव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आवाज, मिसेस डिसुझा आणि खुद्द मिसेस देशमुख यांची पात्रं आणि प्रसंग छान रंगवले आहेत. आपण नकळतपणे आपल्या सोसायटीमधील लोकांना यातल्या कुठल्या ना कुठल्या पात्राशी नक्कीच रिलेट करतो. हा पॉडकास्ट म्हणजे खरच एक उत्तम अनुभव आहे.

 

देशमुख काका

 

Episode 2 : आता घर आपल्या ताब्यात

पालक जेव्हा मुलांना घरी एकटं सोडून जातात तेव्हा घराचं कसं रणांगण होतं याचं खूप छान वर्णन या पॉडकास्ट मध्ये आहे.

राधिका
परितोष

राधिका आणि परितोषला घरी एकटं सोडून जाणं खरंतर आईच्या जीवावर आलं होतं… पण को- ऑपरेटिव सोसायटीमधली लोकं कशी नॉन को- ऑपरेटिव असतात याचा चांगला अनुभव त्या आईला येतो. नाईलाजानं आई मुलांना एकटं सोडून गेल्यानंतर तिच्या सगळ्या सूचनांना फाटा देऊन त्यांनी केलेली लुटुपुटूची लढाई, मारामारी. तसंच आईसाठी खायला काहीतरी करायचं या शुद्ध भावनेतून स्वयंपाकघरात धडपडताना  डब्यांची झालेली पडझड, पीठ, तूप यांची गळाभेट आणि त्यावरून राधिकाचं मसाल्याचा डबा घेऊन घसरून पडणं आणि रंगणं. नासधूस जरी झाली असली तरी ती लपविण्यासाठी केलेली आयडिया आणि आई आल्यावर काय घडणार या विचारानेच धडकी भरणं…..संपूर्ण प्रसंग अतिशय रंजक आणि एन्गेजिंग झाला

Episode 3 : रात्रीचा रणसंग्राम

सोसायटीतलं क्लब हाऊस म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय… त्यात वाढदिवस म्हणजे अजूनच मजा, धमाल आणि धिंगाणा. पण 22 वा वाढदिवस क्लब हाऊस मध्ये करतं का कोणी?

मोरे वहिनी

यात एखाद्या गृहिणीला रात्रीची कामं संपवून, मुलांना झोपवून कधी एकदा झोपतो असं झालेलं असतं कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असतं, मुलांचे डबे, त्यांना तयार करणं, शाळेत पाठवणं किती किती कामं असतात ……पण डी जे च्या मोठ्या आवाजामुळे होणारी चिडचिड, सोसायटीच्या ग्रुपवर येणारे लेलेंचे मेसेजेस, एकमेकांशी फोनवर बोलताना वेगळंच काहीतरी ऐकू आल्याने झालेली गंमत, सोसायटीतल्या सदस्यांचं क्लब हाऊसमध्ये उशिरापर्यंत डी जे लावण्यावरून भांडणं आणि एकमेकांना फाइन भरा म्हणून सांगणं ….यात अचानक लेलेंनी घेतलेली माघार आणि या भांडणाचा लाभ घेत मोरे वहिनींनी घेतलेला केक चा आस्वाद… एकंदरीत घरोघरी मातीच्या चुली हे पटतंय.

Episode 4 : हुरडा पार्टी

बायकांना कुठे मजा करायला जायचं तर खूप गोष्टींची सोय करून ठेवावी लागते. सोसायटीतल्या पुरुषांची गोवा ट्रिप ठरली म्हणल्यावर मिसेस देशमुखांनी बायकांचा महाबळेश्वरचा केलेला आणि बारगळलेला प्लॅन …पण त्याचा हुरडा पार्टीला जाण्याने झालेला मस्त शेवट या पॉडकास्टमध्ये रंगवला आहे.

बस येईपर्यंतच्या गप्पाटप्पा, शॉपिंगवर चर्चा, कोणाला तयार व्हायला वेळ लागतो म्हणून झालेली चिडचिड, बसमध्ये खेळलेला खेळ, केलेली मजा.

हुरडा पार्टी करताना मांडलेला पत्त्यांचा डाव, पत्ते खेळताना रंगलेले किस्से ( यात खरंतर झालेल्या फजितीची आता वाटणारी गंमत) , मुलांच्या माकड चेष्टा, ॲडवेंचर गेम्समधली मज्जा, सोसायटीचा वारसा सांभाळत केलेलं छोटसं भांडण आणि अखेर हुरडा खाऊन घरी परतणं. प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडतोय असं वाटलं. आपणच ही हुरडा पार्टी एन्जॉय करतोय असं वाटलं.

‘को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’ हा पॉडकास्ट आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणातील आनंद व्यक्त करणारा आणि मनाला हलकंफुलकं करणारा अनुभव आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्ती आणि प्रसंगांची आठवण येते. माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावांमधली मजा, त्यांचे आपसातले प्रेमळ रुसवेफुगवे आणि नात्यांमधला ओलावा या सगळ्यांचा अनुभव या पॉडकास्टमधून मिळतो.

हास्य, भांडणं, गोंधळ आणि रोजच्या जगण्यातील साध्या प्रसंगांतून मिळणारा आनंदाचा खजिना असल्यामुळे हा पॉडकास्ट श्रोत्यांच्या मनात घर करून राहतो. तुमच्या सोसायटीमधल्या गंमतीशीर किस्स्यांची आठवण करून देतो. त्यामुळे पुढच्या एपिसोडची आतुरता लागून राहते. ऐका, हसा आणि आपल्या सोसायटीच्या रंगीबेरंगी आठवणींना उजाळा द्या!

५वा एपिसोडही आता उपलब्ध आहे – नक्की ऐका!
🎧 येथे क्लिक करून ऐका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *