सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव : एफ.सी. रोडवरील महिलांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष (छायाचित्र : पहल पाटील )

पुणे, १० फेब्रुवारी २०२५

गोपालकृष्ण गोखले रस्ता (एफ.सी. रोड) हा पुण्यातील सर्वाधिक गजबजलेला आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा रस्ता आहे. येथे असलेली प्रचंड गर्दी आणि वाढती वर्दळ लक्षात घेता, सार्वजनिक सुविधांची गरज अधिक भासते. मात्र, येथे दोन वर्षांपूर्वी उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह सध्या बंद असून, त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बंद असलेल्या स्वच्छतागृहाच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ झाला असून, त्याचा वापर भिकारी आणि अन्य लोकांकडून केला जात आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांना हॉटेल किंवा मॉलमध्ये जावे लागते, जिथे काही ठिकाणी केवळ ग्राहकांनाच स्वच्छतागृहाचा वापर करता येतो सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव हा महिलांच्या मूलभूत सुविधेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृह आवश्यक आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था पाहता, ती वापरण्याजोगी नाहीत. त्यामुळे अनेक महिला जवळच्या हॉटेल किंवा मॉल्समधील स्वच्छतागृहांचा वापर करतात. मात्र, ही सुविधा फक्त ग्राहकांसाठी असल्याने, काही ठिकाणी त्यांना खरेदी करणे भाग पडते. ही परिस्थिती अत्यंत गैरसोयीची असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– स्थानिक दुकानदार

प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून बंद स्वच्छतागृहाची त्वरित दुरुस्ती करावी आणि त्याच्या देखभालीसाठी निश्चित जबाबदारी ठरवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह ही प्राथमिक गरज असून, यासाठी तातडीने सुधारणा होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *