छायाचित्र: IDEOGRAM

(आभासी विश्व- फेसबुक, व्टीटर, ईंन्स्टाग्राम या आंतरजालावरील रंगबिरंगी आभासी विश्वात आपण पुरते गुरफटून गेलो आहोत. आपल्याला मिळालेल्या लाईक्स वरुन लोकप्रियता, लोकांनी केलेल्या काॅमेंट्स वरुन हुशारी, प्रोफाईल पिक्चर मधुन सौंदर्य, आणि प्रत्येक प्रसंगाला पिक्चर परफेक्ट दाखवणारे फोटोज या आपल्या यशाच्या नव्या व्याख्या झाल्या आहेत. यामधे कुठेतरी आपला साधेपणा, सच्चेपणा, मेहनत, खरे ज्ञान, हरवत चाललाय. जे सोशल मिडीयाचा वापर करत नाहीत ते अगदीच सामान्य आणि मागासलेले अशी एक भावना मुलांच्या मनात आहे. हे प्रदर्शनीय  आभासी जगत हेच सत्य असं देखील त्यांना वाटू लागले आहे. त्यावर एक भाष्य!)

काय आई?! कसली गं तू!

काहिचं तुला कळत नाही?

Social media एटीकेट्स शी

कधीच तुझं जुळत नाही??

केक नाही, कॅंडल नाही

एक सुध्दा सेल्फी नाही?

Birthday, Anniversary..

कधी तुझी पोस्ट नाही??

पेस्ट्री, पास्ता, पिझ्झा असं

कधी सुध्दा बनवत नाहीस,

फोटो काढून टाकता येईल

असं यम्मी करत नाहीस!!

Women’s day, Daughters day,

Earth day नी Water day

काहीच तुला माहित नसतं?

सेलिब्रेट करायला कधी,

तुझ्याकडे  कारण नसतं!!

Political situation बद्दल

आपलं मत मांडत  नाहीस

कोणाच्याच कामावर

कधी टिका करत नाहीस??

फिटनेस करता कधीतरी

मॅराथॉन धावतेस का?

तरुण दिसण्यासाठी कधी

झुंबा डान्स करतेस का?

बघ जरा, इतर आया…

किती छान पोस्ट करतात..

हजारो लाईक्स त्यांच्या

प्रोफाईल ला मिळत असतात!!

काय आई, कसली गं तू

सतत कामात गुरफटलेली

मुलं,घर संसार, नातीगोती

जुन्या संस्कारात बुरसटलेली!

फेसबुक, ट्विटर, ईंन्स्टाग्राम

ह्याची मजाच और आहे

हे सगळे नसेल तर…

लाईफ किती बोअर आहे!!

********

होय  बाळं, खरे आहे

आई तुझी  मागासलेली,

सोशल मिडीया च्या विश्वाची,

भाषा  न उमगलेली!

औंक्षण आणि पेढा भरवून

वाढदिवस करता येतो ना?

मुलांच्या वाढण्याचा सोहळा

रोजच साजरा होतो ना?!

Miss you, bless you शब्द

माझ्या तोंडी येत नाहीत

सेल्फी करता खोट हसणं

मला बाई जमत नाही!!

पोहे, शिरा, घावन, उप्पीट

पोटभर खावं थालिपिठ..

पेस्ट्री, पास्ता, पिझ्झा खाउन..

तब्बेत कशी राहील नीट?

डाल्गोना काॅफी, कुल्फी

यांचे गणित जुळत नाही..

पुरणपोळी, खीरीत तुला

काहीच यम्मी  दिसत नाही?

स्त्रीयांची महती कळायला

स्पेशल दिवस का लागतो?

मातीशी नातं जोडायला

 Earth day पुरेसा असतो?

एका दिवसापूरता जागर

मला काही पटत नाही..

उगा सेलिब्रेट करायला..

मन माझं धजत नाही!

सारे नियम पाळावे

हेच मला माहीत असते  

नागरिक म्हणून माझी ड्युटी

बिनचूक मी करत असते!

ह्या पेक्षा मला बाई

राजकारणातलं कळत नाही

टीव्ही समोर नुसतं  बसून

टीका करणं रुचत नाही!

हजारो लाईक्स मिळून सुध्दा

आपलं माणूस मिळत नसतं

हार्ट च्या ईमोजींनी..

खरं प्रेम कळत नसत!

So sad… Really bad

पोकळ शब्दांना नसतो अर्थ

अश्रू पुसल्याशिवाय कुणाचे

ह्या भावना होतात व्यर्थ!

एका हाताने केलेले दान

दुसर्‍या हाता कळू नये

गरीबांना मदत, फक्त

फोटो पूरती मिळू नये!

ढीगभर Information

म्हणजेच  नसतं खरं ज्ञान..

सत्य-असत्य… भले बुरे

यांची देखील लागते जाण!

नेहमीच पिक्चर परफेक्ट

अस आयुष्य नसतं काही

अपूर्णतेतला गोडवा देखील

एंजॉय करता येतो बाई!

जगाबरोबर चालायला

सोशल मिडीयाचा वापर कर

त्याबाहेरील  आयुष्याचाही

मनापासून स्विकार कर

जगभरातील घडामोडींची

माहिती तुला असायलाच हवी

पण जवळच्या माणसांची,

दुखरी नस ही कळायला हवी!

निसर्गातले चमत्कार

त्यातली मजा समजून घे

प्रत्येक क्षण celebration चा

हे सत्य जाणून घे!

Virtual आणि actual

यातली जाण  सीमारेषा

आयुष्य खूप सुंदर आहे

आभासी जगापेक्षा!!

✍ कवी: ️स्वाती नामजोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *